
खामगांव/शेगांव
खामगांव आणि शेगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या निशाण्यावर ठेवून, जयपूर लांडे येथील काही व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर अवैध व्याज वाटप सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्त सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर लांडेथून सूत्रे हलवणारे हे सावकार मध्यस्थांच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील गरजू लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असून, त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दराने बेकायदेशीर व्याजाची वसुली करत आहेत.
गुप्त सूत्रांची माहिती आणि जाळ्यात ओढण्याचे रॅकेट
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आर्थिक अडचणीत असलेल्या किंवा तातडीच्या गरजा असलेल्या नागरिकांना हे सावकार हेरतात. मध्यस्थांमार्फत त्यांना झटपट पैसे उपलब्ध करून दिले जातात, मात्र त्या बदल्यात अवाजवी व्याजदर आकारला जातो. ठरलेली मुदत किंवा व्याजाची रक्कम वेळेत न दिल्यास संबंधित व्यक्तींना धमकावणे आणि त्यांचा मानसिक छळ करण्याचे प्रकार घडत आहेत. या अवैध सावकारीमध्ये नेमके कोण-कोण सावकार सहभागी आहेत आणि त्यांनी आतापर्यंत कोणत्या गरीब नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केली आहे, याबाबतची सविस्तर धक्कादायक माहिती आमच्या हाती आली असून, ती आगामी विशेष वृत्तात पुराव्यासह उघड केली जाईल.
प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी
या अवैध सावकारीमुळे खामगांव आणि शेगांव तालुक्यातील ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. सर्वसामान्य नागरिक हतबल झाले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या अवैध सावकारी करणाऱ्यांचे जाळे उद्धवस्त करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.